कोविड चाचण्यांसाठी शिबिराचे आयोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

। शिर्डी । दि.30 एप्रिल ।  कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोविड रुग्णांना वेळेतच शोधून त्यांच्यावर योग्य उपचार केल्यास कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत होईल. त्यासाठी नेवासा तालुका प्रशासनाने आवश्यकता पडल्यास तालुक्यात कोविड चाचणी शिबिरांचे आयोजन करुन मोठ्या प्रमणावर चाचण्या कराव्यात असे निर्देश ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.



नेवासा तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच  लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना मार्गदशन करताना ते बोलत होते. 

 

खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसलिदार रुपेशकुमार सुराणा, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय करे, गट विकास अधिकारी शेखर शेलार आदी यावेळी उपस्थित होते.



पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. कोविड चाचण्यांसाठी किट उपलब्ध  करुन देणे, कोविड उपचारावरील औषधांचा साठा आणि वितरण, नागरिकांचे लसीकरण आणि रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करुन देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. 

 

लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी, आरोग्य सुविधांचा वापर सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांसाठी प्राधान्याने करावा अशी सूचना केली. शनिशिंगणापूर येथे सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरसाठी ऑक्सिजनचा प्लँट त्वरित सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.



तहसिलदार रुपेशकुमार सुराणा आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित सूर्यवंशी यांनी कोविड रुग्णांची सद्य:स्थिती आणि तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शनिशिंगणापूर येथील कोविड केअर सेंटर येथे मिळून जवळपास सातशे पन्नास बेड्सची उपलब्धता असल्याचे सांगितले. बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, आरेाग्य सेवक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post