मतदार संघासाठी विशेष विमानाने खा.विखेंनी आणले रेमडिसिवीर

। अहमदनगर । दि.25 एप्रिल ।  सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा कहर बघायला मिळत आहे. दररोज रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनाच्या उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या रेमडिसिवीर इंजक्शनचा तुटवडा भासत आहे.



त्यामुळे जास्तीत जास्त रेमडिसिवीर इंजक्शन मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र अहमदनगरचे भाजप खासदार डॉ सुजय विखे यांनी जे सरकारला नाही जमलं ते करुन दाखवलं आहे. सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता विशेष विमानाने थेट दिल्लीवरुन रेमडिसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा आपल्या मतदार संघातील रूग्णांसाठी आणला.



सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन तब्बल 10 हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली. दोन दिवसापूर्वी सुजय विखे यांनी हा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. त्यानंतर त्यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती जाहीर केली. ‘ही इंजेक्शन्स सर्व लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये असं सुजय विखे पाटील म्हणाले.



माझ्या कुवतीनुसार जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण घालू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. 



लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले. मी फॅक्टरीत गेलो, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही सुजय विखेंनी ठणकावून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post