। नवी दिल्ली । दि.25 एप्रिल । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून केंद्र आणि राज्य सरकारे लढाई करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे यावेळी मोदी म्हणाले. तसेच ‘कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे’, असे सांगत ‘आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमातून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर ‘कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे.
राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे’, असेही मोदींनी म्हटले. महत्त्वाचे म्हणजे ‘केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे’, असे मोदींनी सांगितले. ‘केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकाने कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहनही त्यांनी केले.