। मुंबई । दि.29 एप्रिल । राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसागणिक प्रचंड गंभीर होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड कमी पडत असून अनेक ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशात देश-परदेशातून भारतातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.
आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा केली आहे. तसेच मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडीचे एकमत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही लसीकरणाबाबत आग्रही आहोत. मात्र लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. म्हणूनच माझं वर्षभराचं मानधन मी राज्यासाठी देणार आहे. यासोबतच काँग्रेसचे 53 आमदार आपलं महिन्याभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.