। संगमनेर । दि.27 एप्रिल । धारदार हत्याराने डोक्यावर व मानेवर वार करून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील सायखिंडी येथे शनिवारी रात्री घडली.
सायखिंडीच्या मोठेबाबा मळ्यात राहणाऱ्या सचिन अरविंद शिंदे (२८) या युवकाला रात्री दोघांनी मोटारसायकलीवर सोमनाथ निवृत्ती पारधी यांच्या शेतात आणले. सचिनला मारहाण करत धारदार शस्त्राने त्याची मान व डोक्यावर वार केले गेले.
यात सचिन ठार झाला. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सचिनचे वडील अरविंद दामू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
सोमवारी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, आरोपींचा तपास लागला नाही. दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस. सानप करत आहेत.