महापालिका कामगार संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित

। अहमदनगर । दि.27 एप्रिल । अहमदनगर महापालिकेतील कर्मचार्‍यांचा पगार थकीत आहे शिवाय त्यांच्या प्रलंबित मागण्याही असल्यामुळे अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने धरणे आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आज महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्या समवेत संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत मिळालेल्या आश्‍वासनानंतर संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
अहमदनगर महापालिका कामगार संघटना व महापालिकेचे उपायुक्त यांच्या झालेल्या बैठकीच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव आनंदराव वायकर, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, अकील सय्यद, गुलाब गाडे, मुख्य लेखाधिकारी प्रवीण माणकर, अस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अशोक शेडाळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत महापालिका कर्मचार्‍यांचे थकीत वेतन व अनुदान दोन दिवसांत कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा होईल. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तोपर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे दोन हप्ते तातडीने कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावेत.

महापालिकेच्या कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दोन बेड आरक्षित ठेवण्याची मागणी संघटनेने केली. या मागणी संदर्भात महापालिका आयुक्त निर्णय जाहीर करतील असे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या साठयातील शासकीय कर्मचार्‍यांना रेमडेसिव्हिर 10 टक्केसाठा राखीव ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत.

त्यानुसार महापालिका कर्मचार्‍यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळावे. या मागणीवर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून महापालिका आयुक्त निर्णय घेणार आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेतील कार्यालयीन कर्मचार्‍यांतील केवळ 15 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती ठेवण्यात आली आहे.

कायम मानधनावरील व कंत्राटी कर्मचारी यांची तातडीने सक्तीने ऍन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. कर्मचार्‍यांना मास्क, सॅनेटायझर सारखी कोरोना विषयक सुरक्षा साधनांचे वाटप सुरू झाले आहे, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post