खासगीकरणा विरोधात बँक कर्मचारी रस्त्यावर

कापडबाजार ते तेलीखुंट रस्त्यावर 

सोशल डिस्टन्स पाळून निदर्शने


। अहमदनगर । दि.15 मार्च ।  सरकारच्या बँकांच्या खाजगीकरणाच्या निर्णया विरोधात दि. 15 व 16 मार्च 2021 रोजी दोन दिवसाच्या संपाचे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटनांच्या संयुक्त युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या आवाहनास नगरमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. गांधी रोड येथे सर्वसामान्य नागरिक व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागण्यांचे फलक घेऊन खासगीकरणाचा निषेध केला. संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सरकारचा हा निर्णय जनविरोधी व समाजविरोधी असल्याचे सांगितले.


बँक कर्मचारी व अधिकारी संघटना वेळोवेळी अशा कर्जबुडव्यांची नवे जाहीर करून त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत आहे. यासाठी कायद्यामध्ये विशेष व शिक्षेची तरतूद असावी अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या. परंतु, सरकार अश्या कर्जबुडव्यांना अभय देत आहे. आता मात्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खाजगीकरण करणार असल्याचे सूतोवाच केले असतांना पंतप्रधानांनी व्यवसाय करणे सरकारचे काम नाही त्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण करण्यात असल्याचे जाहीर केले.  


बँकांच्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य जनता हि बँकिंग सेवेपासून वंचित होणार असून देशातील गरीब व दुर्बल घटक यांना ऋण मिळणे कठीण होणार आहे.सामान्य नागरिकांची मेहनतीची कमाई जी बँकांमध्ये ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे त्याची परतफेडीची हमी राहणार नाही. खाजगी कारखानदार व उद्योगपतींच्या हातात बँकांचे व्यवस्थापन गेल्याने आज देशात खाजगी बँकांची काय परिस्थिती आहे हे सर्वज्ञात आहे.  


अनेक खाजगी बँका बुडाल्या असतांना त्या सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यात सरकारला यश मिळाले.  जर बँका खाजगी झाल्या तर अश्या परिस्थितीत ठेवीदारांच्या ठेवींचे काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटणार नाही. देशात बेरोजगारांची  भीषण परिस्थिती असतांना कामगार कपातीचे शस्त्र उपसले जाणार त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागणार. बँकांचे खाजगीकरणामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असून ती अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही.


सन 2009-10 मध्ये जागतिक मंदी असतांना भारतीय अर्थव्यवस्थेला फक्त व फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमुळे धक्का पोचला नाही हे तत्कालीन अर्थमंत्री मा. पी. चिदंबरम यांनी सुद्धा मान्य केले होते. परंतु आज आपल्या देशात सुरळीत असलेल्या बँकिंग उद्योगाला खाजगीकरणाच्या माध्यमातून सुरुंग लावण्याचे प्रयत्न  होत आहे. तेंव्हा सामान्य नागरिकांनी वेळीच भविष्यातील धोके लक्षात घेऊन सावध होणे गरजेचे असून बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी हात बळकट करावे असे आवाहन करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिकारी यांना सरकारने बँकांचे खाजगीकरण करू नये या विषयी निवेदन देण्यात आले. निषेधाच्या कार्यक्रमात बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सुरक्षितता बाळगून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांतीलाल वर्मा, कॉम. उल्हास देसाई, कॉम. माणिक अडाणे, कॉम. उमाकांत कुलकर्णी, कॉम. महादेव भोसले, कॉम. सुजय नळे, कॉम. सुजित उदरभरे, कॉम. आशुतोष काळे, कॉम. नहार, कॉम. विशाल इत्यादींनी परिश्रम घेतले.  उद्या दि. 16 मार्च 2021 रोजी दिल्ली गेट या ठिकाणी अश्याच प्रकारे शांततेत निषेध नोंदविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post