। अहमदनगर । दि.02 मार्च । मनपा स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस असल्याने नगरसेवक अविनश घुले यांनी अर्ज दाखल केला आहे.
मनपा स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाकडून घुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, शेख मुद्सर, मनोज दुलम, धनंजय जाधव, सचिन जाधव, संजय चोपडा, विनीत पाऊलबुध्ये, सुनील त्रंबके, निखिल वारे, सागर बोरुडे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्यास मंगळवार व बुधवार, अशी दोन दिवसांची मुदत आहे. सभापतीपदासाठी दि. 4 रोजी दुपारी तीन वाजता निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी (दि.3) दुपारी 3 वाजेपर्यंंत मुदत असून दि.2 रोजी सकाळी 11 ते दुपारी दीड वाजेपर्यंत तर दि. 3 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार आहेत.
नगर सचिव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर सभापती निवडीसाठी दि. 4 रोजी पीठासीन अधिकारी डॉ.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता स्थायी समिती सभागृह येथे विशेष सभा होणार आहे. यावेळी प्रारंभी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
त्यानंतर उमेदवारी माघारीसाठी मुदत देण्यात येईल.एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज राहिल्यास निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचा अजेंडा नगर सचिव कार्यालयाकडून स्थायी समिती सदस्यांना पाठविण्यात आलेला आहे. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून बहुमतासाठी 9 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे.