। अहमदनगर । दि. 19 । अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेवा देणारे चालक व वाहकाचा माळीवाडा बसस्थानक येथे सत्कार करण्यात आला. तर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते बसपुढे नारळ वाढवण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार मुकादम वाहतूकदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पाडळे, वंचित बहुजन आघाडीचे भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार, एएमटी व्यवस्थापक रावसाहेब काकडे, सुभाष पठाडे, सौरभ झिंजे, अनिल गायकवाड, सुनील दिवेकर, भूषण कांबळे, संदीप गायकवाड, जीवन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चाबुकस्वार म्हणाले, भिंगार येथील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला व नोकरदार वर्गाच्या सोयीसाठी शहरात येण्याजाण्याची सोय होण्याकरिता अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन ही बस सेवा कार्यान्वीत करुन घेण्यात आली. या बस सेवेला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळून, सोय झाली आहे. तसेच विद्यार्थी महिला व नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता येत आहे. या सेवाचा वर्षपूर्ती म्हणून शहर बस सेवेचे आभार मानण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.