सावली सोसायटीत वीज पडल्याने झाड पेटले

। अहमदनगर । दि.22 मार्च । येथील सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वीज पडल्याने एक नारळाचे झाड पेटले तर वसाहती मधील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हवामान खात्याने तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता शनिवारी रात्री नगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी संगमनेर तालुक्यातील गावात गारपीट झाली.

त्याच वेळेत नगर शहरात हलका पाऊस पडत होता. मात्र मेघगर्जनेसह परिसरात विजेचा कडकडाट सुरू होतअसताना सावेडी मधील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी मध्ये अचानकपणे खूप मोठा आवाज होऊन वीज पडली.

या आवाजाने अनेकांच्या काळजात धस्स झाले. ही वीज नारळाच्या झाडावर पडताच अग्नीचे तांडव सुरू झाले. या भागाचे माजी नगरसेवक निखिल वारे यांनी तातडीने वीज वितरण कंपनीकडे संपर्क करुन वीज पुरवठा खंडित करण्यासाठी सांगितले.

यानंतर अग्निशमन विभागाशी संपर्क करून आग विझविण्यासाठी गाडी मागवली. कॉलनीत नागरिकांना घाबरून न जाता धीर देत सुनील मानकर यांनी प्रयत्न केले. वीज पडून कोणाचे टीव्ही फ्रिज जळाले तर कोणाचे वीज मीटर जळून खाक झाले आहे.

आर्थिक नुकसान झाले असले तरी जीवितहानी मात्र झाली नाही. मध्यंवस्तीत वीज पडल्याने नागरिक मात्र भयभीत झाले होते. वीज पडली तेव्हा आवाज इतका मोठा होता की भुंकप झाल्या सारखे जानवले असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post