पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने पूजन
। अहमदनगर । दि.02 मार्च । संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील थोर संत होते, शिव आणि विठ्ठल एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. संतांनी दिलेले विचार हे आपल्या आयुष्याला सत्मार्ग दाखविणारे आहेत.
त्यांनी मनुष्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी आपल्या वाणीतून भगवंतांचा सेवा मार्ग दाखविला आहे. संतांचे थोर वचन आपणास जीवनात मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे संतांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोर्ट गल्ली येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात त्यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनप्पा, विशाल वालकर, परेश लोखंडे, आनंद लहामगे, काका शेळके, बाळासाहेब भुजबळ, प्रकाश लोळगे, सागर शहाणे, संजय देवळालीकर आदि उपस्थित होते.
यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, संत सेना महाराजांनी समाजातील अनिष्ठ प्रथा, रुढी-परंपरांना छेद देऊन चांगल्या समाज निर्मितीसाठी अभंगाच्या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणली. आपणही समाजात काम करतांना समाजातील वंचित घटकांसाठी काम केले पाहिजे, असे आवाहन केले.
संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश देवळालीकर, मुकुंद निफाडकर, शरद कुलथे, विजय हिंगणगांवकर, कैलास मुंडलिक आदिंसह ट्रस्टचे पदाधिकारी व सोनार समाज बांधव उपस्थित होते. प्रास्तविकात ट्रस्टचे संजय देवळालीकर यांनी मंदिराच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेवटी विशाल वालकर यांनी आभार मानले.