। अहमदनगर । दि.02 मार्च । राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ विक्रीची बंदी असताना शहरात अवैधरीत्या विक्री करणार्या दोघांवर येथील तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई लालटाकी परिसरात अप्पू हत्ती चौक येथे रविवारी ( दि.28) केली.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक विशाल ढूमे यांना गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती मिळाली की लाल टाकी परिसरातील अप्पू हत्ती चौक येथे जय हनुमान पान सेंटर मध्ये अवैधरित्या मावा,गुटखा व सिगारेट विक्री होत आहे.
या माहितीवरुन पोलीस अधीक्षक ढूमे यांनी त्यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने अप्पू हत्ती चौकातील पान टपरीवर छापा टाकला. या कारवाईत तुषार संदीप घोरपडे (वय.18 रा.लालटाकी अ.नगर) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील दोनशे दहा रुपयांचा हिरा गुटखा,
दोनशे रुपये किमतीच्या गायछाप तंबाखूच्या पुड्या, एकशे पच्यांनव रुपये किमतीच्या विमल गुटख्याच्या पुड्या, शंभर रुपयांचा मावा, एक हजार दोनशे रुपये किमतीच्या सिगारेट्स आठशे चाळीस रुपयाची रोकड असा दोन हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा माल जप्त केला.
तुषार कडे अधीक चौकशी केली असता तो टपरीवर कामास असून टपरी मालक लक्ष्मण देविदास राठोड असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलीस हवालदार बाळासाहेब मासळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोळंके हे करीत आहेत.