नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीत प्रति पंढरपुर असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा 24 वा वर्धापन दिन कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणाने मोजक्या भक्तगणांत साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका ज्योती गाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी अमोल गाडे, माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि.मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, अॅड.साहेबराव दरवडे, एन.डी.कुलकर्णी, आशिष ब्रह्मे, संदिप यादव, राजेश अध्यापक, मकरंद जामदार, अक्षय सोनवणे आदि उपस्थित होते.
गाडे पुढे म्हणाल्या पंढरपुर येथील मूर्तीप्रमाणेच या मंदिरातील मुर्ती येथे असल्याने जणू काही पंढरपूरात दर्शन धेतले असे वाटते. प्रेम, भक्ती, ज्ञान आणि मानवता या चार स्तंभावर पंढरपुरातील आध्यात्म सुखात नांदत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्या रद्द झाल्या. विठ्ठल-रुख्मिणीच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकर्यांसह सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाचा नायनाट करावा. म्हणजे यंदा दिंडी होऊन पंढरीची वारी घडेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्तविकात मंदिराचे संचालक आदिनाथ जोशी म्हणाले, अर्बन बँक कर्मचार्यांची ही खूप जुनी व सर्वात प्रथम असलेली वसाहत आहे. रहिवाशांना आध्यात्मिक समाधान मिळावे, म्हणून येथे मंदिर बांधले. त्यानिमित्ताने कॉलनीतील सर्व भाविक एकत्र येतात, भक्तीमय वातावरण तयार होते. मंदिरामुळे पंढरपुरकडे जाणार्या दिंडी येथे थांबतात यांचे समाधान वाटते.
कोरोनावर मात करुन 25 वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्याचा आमचा मानस पांडूरंगाने पूर्ण करावा, असे अभिजित जोशी यांनी मनोगतात सांगितले. भार्गव जोशी, अश्विनी अध्यापक यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले. शेवटी प्रज्ञा जोशी यांनी आभार मानले.