। जेजूरी । दि.14 फेब्रुवारी । मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.या पुतळ्याचे शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले आहे. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हे देखील उपस्थित होते.
जानकरांनी हे वक्तव्य शरद पवारांसमोर केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं महादेव जानकरांनी म्हटलंय.
