मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

मंत्री संजय राठोड विरोधात भाजपा महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला असुरक्षित : अंजली वल्लाकटी


। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी ।राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे. नागरिकांची कामे करणे, त्यांना सोयीसुविधा पुरविणे ही कामे करण्यापेक्षा सरकारमधील मंत्र्यांमध्ये महिलांवर अत्याचार करण्याची चढाओढ लागली आहे. नव्यानेच उघड झालेले मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण भयानक आहे. 

 

युवतीवर अत्याचार करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे भक्कम पुरावे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अद्याप राजीनामा न घेता या प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. अत्याचारित कुटुंबावर मंत्री राठोड दादागिरी करीत दबाव टाकत आहेत. त्यामुळे कुटुंबही घाबरलेले आहे. आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात महिला असुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शहर जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी केले.


 भाजपा शहर महिला आघाडीच्या वतीने येथील दिल्लीगेट चौकात मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात  दिल्लीगेट वेश बंद करत रास्ता रोको व त्यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी  महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली वल्लाकटी,  प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्ये, प्रिया जानवे, कॅन्टोन्मेंट सदस्या शुभांगी साठे, नम्रता सगम, सविता सामल, अर्चना चौधरी, संध्या पावसे, ललिता कोटा, अश्‍विनी करांडे आदी महिला उपस्थित होत्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत हे आंदोलन पार पडले.


यावेळी सुरेखा विद्ये म्हणाल्या की, तिघाडीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात दबलेले असल्याने ते सक्षम निर्णय घेताना दिसत नाहीत. अत्याचार करणार्‍या मंत्र्यांना ते पाठीशी घालत आहेत. त्यांनी ताबडतोब मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर भाजपा महिला आघाडी शांत न बसता अधिक तीव्र आंदोलन करतील, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post