। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाने शुक्रवारी (दि.12) याबाबतचा आदेश काढला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यापासून महापालिकेचे आयुक्तपद रिक्त होते.
या पदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे होता. नगर विकास विभागाने शुक्रवारी महापालिका आयुक्तपदी शंकर गोरे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.
गोरे हे ऑगस्ट 2020 पासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापुर्वी सन 2007 ते 2011 पर्यंत चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर पंढरपूर तसेच सातारा नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे.
