। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । सोशल मीडियाच्या काळात पुस्तकांचा विसर पडत चालला आहे. आधुनिक पिढी घडण्यासाठी त्यांची पुस्तकांची नाळ कायम रहिली पाहिजे. पुस्तकांतून संस्कार मिळतात. हेच लक्षात घेऊन शिवजयंती विविध खर्च टाळून विद्यार्थ्यांना ‘आमचं इमानं रायगडाच्या मातीशी’ या ग्रुपने पुस्तकाचे वाटप केले.
कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान येथील तरटेवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत या ग्रुपने शिवजयंती साजरी केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
मुन्ना शेख म्हणाले, “तीन वर्षांपासून ग्रुपतर्फे ज्ञानप्रसारक शिवजयंती साजरी केली जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाला दरवर्षी परिसरातील युवकांकडून पाठबळ मिळत आहे. ग्रुपतर्फे शिवजयंती दरवर्षी साध्यापद्धतीने साजरी केली जाते.
मिरवणुकींवर खर्च टाळला जातो”. कोरोनामुळे यावर्षी प्रत्येक सण-उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. असे असले तरी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामे थांबलेली नाहीत आणि थांबणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. पियुष गांगडे, मुन्ना शेख, जावेद पठाण, शिवकुमार बोरुडे, राहुल साळवे, निसार शेख, शाळेचे मुख्याध्यापक संतोष घोडके, शिक्षिका सुनिता वाघ आदी उपस्थित होते.