। नवी दिल्ली । दि.16 मे 2025 । पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानची पुरती नांगी ठेचली असून, यासंदर्भात बोलतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. सिंदूर केवळ शोभेचे नव्हे तर शौर्याचे प्रतीक आहे. हा तर फक्त ट्रेलर होता, अजूनही चित्रपट बाकी असून वेळ आल्यावर संपूर्ण जगाला चित्रपट दाखवू असा इशाराच राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानला दिला आहे. संरक्षणमंत्री सिंह यांनी शुक्रवारी गुजरातमधील भूज हवाई तळावर भेट देत सैनिकांची भेट घेतली, यावेळी ते बेलत होते.
सैनिकांना संबोधित करतांना संरक्षणमंत्री रानाथ सिंह म्हणाले की, सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवले आहे. जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल. पाकिस्तानने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची शक्ती पाहिली असून, पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात ब्राह्मोसने चांदणे दाखवले आहेत. संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, मी तुमचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही चमत्कारिक काम केले आहे. तुम्ही भारताचे डोके उंचावले आहे. मी आपल्या सैनिकांना सलाम करतो. तुम्हा सर्वांमध्ये असल्याचा मला अभिमान आहे. भूज हे 65 आणि 71 च्या युद्धांमध्ये आपल्या विजयाचे साक्षीदार राहिले आहे आणि आजही ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे साक्षीदार आहे. तुमच्या शौर्याने दाखवून दिले आहे की हे ते सिंदूर आहे जे शोभेचे नाही तर शौर्याचे प्रतीक आहे. हे ते सिंदूर आहे जे सौंदर्याचे नाही तर दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. हे सिंदूर म्हणजे भारताने दहशतवादाच्या कपाळावर ओढलेली धोक्याची लाल रेषा आहे. या लढाईत सरकार आणि सर्व नागरिक एकत्र आले.