। अहमदनगर । दि.11 फेब्रुवारी । शहरासह उपनगरात धूमस्टाईल व सोन्याचे दागिणे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, त्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे.
सध्या नगर शहरासह उपनगरामध्ये धुम स्टाईल व दरोडे, लहान मोठया चोर्यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहर व उपनगरात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये सोने लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. चोर भरदिवसा तसेच सायंकाळच्या वेळेस घरावर दरोडा टाकून लुटमार करीत आहेत.
तसेच रस्त्यावर फिरणार्या महिलांच्या गळयातील मंगळसूत्र, दागिने लुटण्याचा प्रकार राजरोस सुरू आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये अतिशय भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
शहर व उपनगरामध्ये घडणार्या अशा घटनांमुळे नागरिक व संबंधीत भागातील नगरसेवक यांचेकडे देखील तक्रारी करून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल .असून, नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
नुकतेच कोवीड महामारी आटोक्यात येत असून नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. त्याचा फायदा घेवून चोरांनी चोरीचे सत्र सुरू केले आहे. हे थांबणे गरजेचे आहे, याकरिता तपास यंत्रणा सक्षम करून चोरांना त्वरीत गजाआड करणे आवश्यक आहे.
यादृष्टीने तपास यंत्रणेद्वारे चोरांना गजाआड करून शहर व उपनगरामध्ये पोलीस गस्त वाढविणे गरजेचे आहे, असे महापौर वाकळे यांनी म्हटले आहे.
