। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी । राहुरी तालुक्यातील तांभेरे (माळवाडी) परिसरातील बापूसाहेब लक्ष्मण हापसे वय 45 या शेतकर्याने कणगर शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हापसे गेल्या दोन दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाही. शुक्रवारी, 19 फेब्रुवारीला दुपारी कणगर शिवारातील एका पडक्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळून आला.
साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली असावी, असे मृतदेहाच्या स्थितीवरून दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच कणगर येथील गावक-यांनी बापूसाहेब हापसे यांचा मृतदेह रुग्ण वाहिकेतुन राहूरी येथे शवविच्छेदनासाठी आणण्यासाठी मदतकार्य केले.
शुक्रवारी सायंकाळी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर बापुसाहेब यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृत हापसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
हापसे हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीवरील कर्जामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
