। अहिल्यानगर । दि.15 मे 2025 । अंमली पदार्थांची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. या टेम्पोत 13 कोटी 75 लाख 41 हजार रूपये किंमतीचे अंमली पदार्थ आढळून आले. श्रीरामपूरमधील दिघी- खंडाळा रोडवर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि श्रीरामपूर पोलिसांनी केली.
एमएच 20 बीटी 0951 क्रमांकाचा टेम्पो खंडाळ्याकडून दिघीकडे येताना पथकाला दिसला. पोलिस पथकाने सदरचा टेम्पो थांबविला. मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय 38, रा. धनगरवाडी, ता. राहाता) असे टेम्पो चालकाने नाव सांगितले. टेम्पोची झडती घेतली असता, टेम्पोच्या मागील बाजूस पांढर्या रंगाच्या 21 गोण्या दिसून आल्या.
त्यापैकी 14 गोण्यांमध्ये पांढर्या रंगाची पावडर आणि उर्वरित 7 गोण्यांमध्ये पांढर्या रंगाचे स्फटीक दिसून आले. राशिनकर यास विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारले असता, सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम औषधांचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर ही अल्प्राझोलम बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले.
अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरीता नगर येथील फॉरेन्शिक तज्ञांशी संपर्क साधला. टेम्पोमधील स्फटीक व पावडर यांचे निरीक्षक करून प्रथमदर्शनी सदरचे स्फटीक हे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ व पावडर ही अल्प्राझोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याने सांगितले.
6,97,67000 रूपये किंमतीचे 69.767 किलो स्फटीक, 6,76,74000 रूपये किंमतीची 338.37 किलो वजनाचे अल्प्राझोलम बनविण्याची पावडर, 1 लाख रूपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 13 कोटी 75 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदरचा माल विश्वानाथ कारभारी शिपनकर (रा. दौंड) याने दिला असल्याचे राशिनकर याने पोलिसांना सांगितले. राशिनकर व शिपनकर या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.