। मुंबई । दि.11 जानेवारी । ब्रिटनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाही महाराष्ट्रात दाखल झाला आहे. खारघरमधील टाटा मेमोरिअलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. तीन रुग्णांपैकी एक रुग्ण ठाण्यातील आणि एक रायगडमधील आहे. दरम्यान, ब्रिटनमधील स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील E484K म्युटेशन खतरनाक असल्याचे समजले जात आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या भारतातही वाढू लागली आहे. त्यात आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाही भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाचे मुंबईत तीन रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या विषाणूविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत.
दरम्यान, १६ जानेवारीपासून भारतात कोरोना लस देण्यात येणार आहे. तर अनेक देशांचे भारतीय लस मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत. तर कोरोना लस घेण्यासाठी म्यानमार आणि दक्षिण आफ्रिका देशांनी याआधीच भारताशी करार केला आहे.
