रुपेरी पडद्यावर नवीन वर्षामध्ये दिसणार स्टारकिड्ससह नवीन चेहरे

। मुंबई ।  जानेवारी । सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवुडमध्ये  नेपोटिझमची चर्चा जोरदारपणे सुरु झाली होती. बॉलिवुडमध्ये यशस्वी असलेल्या कलाकारांच्या मुलांना ताबडतोब संधी मिळते तर नव्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. 

प्रत्येक वर्षी स्टार किड्स ज्याप्रमाणे रुपेरी पडद्यावर येतात त्याचप्रमाणे संघर्ष करून अनेक नवे चेहरेही पडद्यावर येतात. 2021 ही त्याला अपवाद नाही. यावर्षीही अनेक स्टार किड्ससह नवे चेहरे रुपेरी पडद्यावर नायक-नायिका म्हणून दिसणार आहेत.

या यादीत सगळ्यात वर नाव घ्यावे लागेल अहान शेट्टीचे. अहान हा प्रख्यात अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया अगोदरच नायिका म्हणून बॉलिवुडमध्ये काम करू लागलेली आहे. आता अहानही नायक म्हणून रुपेरी पडद्यावर येणार आहे.

अहानप्रमाणेच मिथुनचा दुसरा मुलगा नामाशी चक्रवर्तीही यावर्षी रुपेरी पडद्यावर येणार आहे. नामाशी ‘बॅड बॉय’ सिनेमातून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नामाशीचे नशीब खूप चांगले आहे. कारण त्याच्या या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन प्रख्यात यशस्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी करीत आहे.

छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यावर्षी नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पलकला लाँच करीत आहे विवेक ओबेरॉय. विवेक ओबेरॉय सत्य घटनेवर आधारित रोजी: द सॅफ्रॉन चॅप्टर सिनेमा तयार करीत असून यात पलक मुख्य भूमिका साकारणार आहे.

मिस वर्ल्ड, मिस इंडिया, मिस यूनिव्हर्स झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये त्यांनी येणे अलिखित नियम आहे. ही परंपरा मानुषी छिल्लर यावर्षी कायम ठेवणार आहे. मानुषी 2017 मध्ये मिस वर्ल्ड झाली पण सिनेमात यायला तिला चार वर्षे लागली आहेत. यशराज अक्षयकुमारला घेऊन ऐतिहासिक ड्रामा ‘पृथ्वीराज’ तयार करीत आहे. या सिनेमात अक्षयकुमारची नायिका म्हणून मानुषीला साईन करण्यात आलेले आहे.

अमेझॉन प्राईमवरील कबीर खान निर्मित वेब सीरीज ‘द फॉरगॉटन आर्मी -आझादी’ मध्ये शर्वरी वाघने काम केले होते. तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. वेबसीरीजमधून शर्वरी आता थेट यशराजच्या बंटी और बबली 2 मधून बॉलिवुडमध्ये एंट्री करणार आहे. पहिल्याच सिनेमात शर्वरीला सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

रश्मिका मंदानाही साऊथमधील यशस्वी आणि प्रचंड लोकप्रिय नायिका आहे. रश्मिकाला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक मोठे निर्माते तयार आहेत. रश्मिका बॉलिवुडमध्ये ‘मिशन मजनू’ सिनेमातून एंट्री करणार आहे. यात तिचा नायक सिद्धार्थ मल्होत्रा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post