ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार यांचे निधन

। अहमदनगर । दि. 24 जानेवारी । नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सार्वमतचे माजी संपादक नंदकुमार सीताराम सोनार (वय : 54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ,  बहिण, भाचे असा मोठा परिवार आहे.

पत्रकारितेत नावलौकिक करून जिल्ह्याच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांना वाचा फोडून न्याय देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेत विविध संस्थांकडून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दैनिक सार्वमतमध्ये त्यांनी वार्ताहर पदापासून सुरुवात केली. सार्वमत वृत्तपत्राचे ते 12 वर्षे संपादक होते.

पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांना हात घालून त्यांनी वाचा फोडली. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी अशा विविध क्षेत्रांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अहमदनगर प्रेस क्लबच्या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी अध्यक्षपद भूषविले. अहमदनगर जिल्हा पत्रकार भवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, दर्पण पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार, महाराष्ट्राचा महानायक, अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. निर्भिड पत्रकारिता करून जिल्ह्यात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकारितेत अनेक युवकांना संधी देऊन त्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post