कन्हेरओहळ येथील घटना : शॉक लागून महावितरण ठेकेदाराच्या कर्मचार्‍याचा मृत्यू

। अहमदनगर । दि.17 जानेवारी ।  पारनेर शहरातील कन्हेरओहळ येथे खासगी कार्यशाळेची वीज जोडणी करताना महावितरण ठेकेदाराच्या कर्मचार्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात येऊनही वाहिनीत वीज प्रवाह आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

शनिवारी विविध कामांच्या निमित्त पारनेर शहर व परिसरातील वीजपुरवठा बंद असतो. दुपारी एक वाजेच्या सुमारास महावितरणचा ठेकेदार गाडीलकर याने परवानगी घेऊन मंदार नाईक यांच्या कार्यशाळेच्या वीज जोडणीचे काम सुरू केले होते.

विजेच्या खांबावर मुकुंदा रोडे (वय 23 परभणी, हल्ली रा. पठारवाडी पारनेर) हा ठेकेदाराचा कर्मचारी वीजजोडणीचे काम करीत होता. वीजपुरवठा बंद असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने जोडणीचे काम सुरू केले. काम सुरू असतानाच तारांमध्ये वीजप्रवाह आला.

त्यात रोडे हा वाहिनीस चिकटून त्याचा खांबावरच मृत्यू झाला. परंतू तारांमध्ये वीजप्रवाह कसा आला याची विशेष पथकाकडून तपासणी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post