। नागपूर । दि.17 जानेवारी । कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. त्यामुळे साहित्यविश्वात प्रचंड खळबळ माजली आहे.
ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर साहित्य संघाने फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधून या पुरस्काराची माहिती दिली. तेव्हा त्यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले.
नंतर साहित्य संघाने त्यांना पत्र पाठवले. त्यावरही त्यांनी संमतीचे पत्र दिले. मात्र नंतर अचानक त्यांनी हा पुरस्कार नाकारला. माझी इहवादी भूमिका तसेच लेखक म्हणून असलेली भूमिका याची साहित्य संघाला कल्पना असेल, असे मला वाटत होते.
तसा माझा समज होता. परंतु कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय काय असेल, असे मी जेव्हा आयोजकांना विचारले. तेव्हा त्यांनी सरस्वतीची प्रतिमा मंचावर असेल, असे मला सांगितले.
त्या क्षणी मी माझी मूल्ये नाकारून हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, असे सांगून नम्रपणे हा पुरस्कार नाकारत असल्याचे आयोजकांना कळवले, असे कवी यशवंत मनोहर यांनी म्हटले आहे.
अशा पुरस्कार समारंभात सरस्वतीऐवजी सावित्रीबाई फुले किंवा राज्यघटनेची प्रतिमा का ठेवू शकत नाही. किंबहुना वाडःमयीन कार्यक्रमात कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिमा का ठेवल्या जात नाहीत, असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
