लसीकरण टाळण्याच्या मानसिकतेत बदल व्हावा ; आरोग्यमंत्र्यांचे मत

। मुंबई । दि.21 जानेवारी । 'आधी तू लस घे मग मी घेतो' अशी मानसिकता आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये दिसत असून ही मानसिकता दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सगळ्या आरोग्य कर्मचार्‍यांना पाठवले जात आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

कोरोना वरील दोन्ही लसी सुरक्षित आहेत. वैज्ञानिकांनीच तशी खात्री दिली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचार्‍यांनी कोणतीही भीती न बाळगता सहभागी व्हावे, असे आवाहनही टोपे यांनी केले. टोपे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी राज्यातील कोरोना लसीकरणाबाबत टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

राज्यात पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 54 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अ‍ॅप संथगतीने चालत असल्याने काहीशी आडकाठी येत आहे. लाभार्थींची दुबार नावेही जात आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनात थोडासा गोंधळ होणे स्वाभाविक आहे, म्हणून ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याचे काम केंद्रस्तरावर सुरू आहे. केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत आणि निश्‍चितच या त्रुटी दूर होतील, असा विश्‍वास टोपे यांनी व्यक्त केला.

कोरोना लसीबाबत चुकीचे विधान वा माहिती माध्यमांतून जाऊ नये आणि संभ्रम होऊ नये, याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी या वेळी केले.  महाराष्ट्रात पहिल्या दिवशी लसीकरणाचे प्रमाण 65 टक्के होते. देशात पहिल्या दोन-तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. आतापर्यंत 54 टक्के लसीकरण झाले हे काही कमी नाही, असे नमूद करताना टक्केवारीवर जाऊ नका. लसीकरण होत आहे हे महत्त्वाचे आहे. 

आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही. आम्ही या सगळ्याला सज्ज आहोत. छोट्या छोट्या उणिवा आहेत, त्या दुरुस्त केल्या जात आहेत. ऑफलाइन लसीकरण करण्यावर भर देतो आहोत. प्रत्येक सेंटरला रोज 100 जणांचे लसीकरण व्हावे, असे आदेश दिलेले आहेत. अ‍ॅप सुरळीत झाल्यास याला गती येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post