। पारनेर । दि.21 जानेवारी । पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे बिबट्याच्या दोन ते तीन महिन्याच्या बछड्याचा मृत्यू झाला हा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे मात्र वनाधिकार्यांनी यासंदर्भात पंचनामा करून बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन केले आहे. तालुक्यात बिबट्याने सध्या धुमाकूळ घातला आहे अनेक भागांमध्ये बिबट्या व त्याचे पिल्ले आढळून आले आहेत.
तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी भानुदास एकनाथ गाजरे त्यांच्या शेतामध्ये दि.20 रोजी सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृतावस्थेत त्यांना दिसून आला त्यानंतर त्यांनी त्वरित याबाबत पारनेर वन विभागाशी संपर्क साधला त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अहमदनगर एस पी पाटील पारनेरचे वनक्षेत्रपाल सीमा गोरे वनपाल संदीप भोसले वनरक्षक अश्विनी सोळुंके वनमजूर गोरे पाचरणे जनार्दन बोरुडे घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याच्या पिल्लाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला पशुवैद्यकीय अधिकारी वाळुंज यांनी शवविच्छेदन केले आहे त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित बिबट्याच्या पिल्लावर अंत्यसंस्कार केले.
दरम्यान पिंपळनेर व राळेगण थेरपाळ आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे या परिसरामध्ये ऊस व इतर झाडी असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर येथे नेहमी असतो काही दिवसापूर्वी येथील ऊस तोड झाली होती त्या शेजारीच बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले आहे.
बिबट्याचे पिल्लू मादी जातीचे असून हे तीन महिन्याचे असण्याची शक्यता असून सर्पदंश किंवा दुसऱ्या कोणत्या प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला व त्याचा मृत्यू झाला असू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे. एक महिन्यापूर्वी करंदी व किंन्ही या परिसरात एका बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच आज पिंपळनेर येथे बिबट्याच्या बसवण्याचा मृत्यू झाला आहे .
