तिसर्‍या दिवशीही लसीकरणाला चांगला प्रतिसाद : सायंकाळी 4 वाजेपर्यंत 696 जणांचे लसीकरण

। अहमदनगर । दि.20 जानेवारी । कोरोना लसीकरण मोहिमेस जिल्ह्यात दिनांक 16 जानेवारी रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 12 केंद्रावर 871 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवार आणि बुधवारी पुन्हा लसीकरणाची मोहिम या केंद्रांवर राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना ही लस दिली जात आहे. आज, बुधवारी एकूण  जणांना लस देण्यात आली.

जिल्ह्यात एकूण 21 केंद्र असून पैकी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र अशा 12 केंद्रांवर ही मोहिम सुरु आहे.

या केंद्रांवर प्रतिदिन 100 जणांना लसीकरण देण्याची तयारी आरोग्य विभागाने यापूर्वीच केली आहे. त्यानुसार, पोर्टलवर नोंद असलेल्या आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येत आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरणामुळे कोणाला तीव्र त्रास झाला नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. कोणतीही लस अथवा इंजेक्शन दिल्यानंतर हात दुखणे, किंचीत ताप येणे अथवा मळमळणे आदी सामान्य लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

दिनांक 16 रोजी या 12 केंद्रांवर 871 जणांनी लसीकरण करुन घेतले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी लसीकरण मोहिमेचे नियोजन केले. महापालिका क्षेत्रातील 4 आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये येथील वैद्यकीय अधीक्षक आणि त्यांचे सहकारी ही मोहिम राबवित आहेत.

दिनांक 16 रोजी लसीकरण मोहिमेचा पहिला दिवस आटोपल्यानंतर दि. 17 आणि दि. 18 रोजी लसीकरण मोहिम थांबवण्यात आली. त्यानंतर पुन्हा मंगळवारी (दि. 18) ही मोहिम सुरु झाली. काल एकूण 650 जणांचे लसीकरण करण्यात आले. आज दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजताच पुन्हा लसीकरण सुरु करण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत 12 केंद्रांवर 260 जणांचे लसीकरण झाले होते. दुपारी 2 वाजेपर्यंत 417 तर सायंकाळी 4 वाजेपर्यत 696 जणांनी लसीकरण केले होते.

यामध्ये  जिल्हा रुग्णालय येथे 77, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी - 35, उपजिल्हा रुग्णालय कर्जत - 9, शेवगाव ग्रामीण रुग्णालय - 67, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय- 52, राहाता ग्रामीण रुग्णालय -52, संगमनेर ग्रामीण रुग्णालय - 71, अकोले ग्रामीण रुग्णालय -104 तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र -30, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र -85, केडगाव नागरी आरोग्य केंद्र 26 आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे 88 जणांचे लसीकरण करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post