नगर, (दि.08 डिसेंबर) : उपनगरीय भागातील बोल्हेगाव येथील गणराज कॉलनीत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी उचकापाचक केली. तसेच, किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत चारशे ते पाचशे रुपयांची चिल्लर चोरून नेली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांच्या दहशतीने संपूर्ण परिसराने रात्र जागूनच काढली.
गणराज कॉलनीतील सनफार्मा शाळेजवळ ही चोरी झाली आहे. या दोन्ही घरफोड्यांमध्ये किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. अज्ञात चोरट्यांनी अगोदर बंद घरांवर निशाणा साधला आहे. त्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटाची उचकापाचक केली आहे. या घरातील सर्व मंडळी बाहेरगावी गेली आहेत. त्यामुळे तपशील समजू शकला नाही. दरम्यान, किराणा दुकान फोडूनही चोरट्यांच्या हाती चिल्लर लागली आहे.
दरम्यान, याबाबत 100 क्रमांकावर फोन करूनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. बर्याच वेळेनंतर तोफखाना पोलीस ठाण्याचा ‘पिंजरा’ आला. त्यातही फक्त एकच पोलीस कर्मचारी होता. ड्रायव्हर वेगळा होता. उशीरा का होईना पोलीस आल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
