दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने 

 शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी


नगर, (दि.06 डिसेंबर) :  केंद्र सरकारने शेतकर्‍यांवर लादलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात आली. तर दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.


राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, शारदा लगड, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, अशोक बाबर, सबाजीराव गायकवाड, किसनराव लोटके, उद्धव दुसुंगे, सुहास कासार,केशव बेरड, रत्नाकर ठाणगे, आबासाहेब सोनवणे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप सरकार आडमुठी भूमिका घेऊन शेतकर्यांशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्यास तयार नाही. शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याची तयारी भाजप सरकारने चालवली आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना देखील केंद्र सरकार डोळेझाक करीत आहे.


भर थंडीत आंदोलक शेतकर्‍यांच्या अंगावर थंड पाण्याचा मारा केला जातोय. शेतकर्‍यांचे प्रश्‍न न सोडवता, मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकरी विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी यावेळी शेतकरी विरोधी असलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करून, शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला.


तर भाजप सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांचे हित जपण्यासाठी अशा पध्दतीने निर्णय घेत असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव तातडीने देण्यात यावा, कृषी विषयक विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. तर मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post