नगर, (दि.12 डिसेंबर) : नगर शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्वासार्ह नसल्याच्या कारणाने न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी भिंगारजवळ 23 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 92 लाख रुपये शिवाजी व प्रकाश कर्डिले यांना दिले होते. मात्र, त्यांनी ही जमीन दुसर्यांना विकल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. कांकरिया यांचा दावा होता. यासंदर्भात डॉ. कांकरिया यांनी शिवाजी कर्डिले यांच्या घरी जाऊन विचारणा केली.
त्यावेळी कर्डिले यांनी पिस्तुलचा धाक दाखवून धमकाविले. यावेळी प्रकाश कर्डिले उपस्थित होते. प्रकाश यांचा मुलगा अनिल यास पुरावे नष्ट करण्यासाठी जाताना पोलिसांनी पकडले होते, असा कांकरिया यांचा आरोप होता.
या प्रकरणामध्ये न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये कांकरिया यांच्याकडून अॅड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली तर शिवाजी कर्डिले यांच्याकडून अॅड. विश्वास आठरे यांच्यासह अॅड. रघुनाथ मुरुमकर तर प्रकाश व अनिल कर्डिले यांच्याकडून अॅड. सुधीर बाफना यांनी बाजू मांडली.
सर्व उपलब्ध पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तिन्ही आरोपींना सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, हे प्रकरण त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात गाजले होते. ह्या खटल्यात अनेक वर्षे कामकाज झाले. त्यानंतर कर्डिले यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
