नगर, (दि.03 डिसेंबर) : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना तीन महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर यांनी ही शिक्षा सुनावली. शिवाजी दगडू काळे, चंदाबाई शिवाजी काळे व संभाजी शिवाजी काळे (सर्व भावीनिमगाव शिवार, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी योगेश बबन काळे व त्यांची आई केशरबाई हे दोघे त्यांच्या शेतात गिन्नी गवत कापत होते. यावेळी आरोपी तेथे पळत आले. तुम्ही गवत कापू नका, ही आमची हद्द आहे, असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. ही घटना ४ जून २०१७ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. फिर्यादी व त्यांच्या आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांचे काही न ऐकता खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीचे वडील व जवळच वस्तीवर राहणारे सोमनाथ रतन शिरसाठ हे त्यांना सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी पोबारा केला. फिर्यादी व त्यांच्या भावाने जखमी झालेल्या केशरबाई यांना घेऊन शेवगाव पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक आय. बी. शेख यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. समाेर आलेले साक्षी, पुरावे, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत तीन महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी ७० हजार रुपये जखमीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय लक्ष्मण काशीद यांनी सहकार्य केले.
