नवीदिल्ली, (दि. 29 डिसेंबर) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्राच्या निर्णयावर टिका करताना म्हणाले की, केवळ दिल्लीत बसून शेती विषयक निर्णय घेता येत नाहीत, त्यासाठी गावात जाऊन तेथे काम करणार्या शेतकर्यांची मते विचारात घ्यावी लागतात. केंद्राने स्वबळावर व स्वतःच्या विचारानेच ही विधेयके संमत केल्याने ही समस्या सुरु झाली आहे.
केंद्र सरकारने कोणत्याही राज्याशी चर्चा न करताच कृषी विषयक तीन कायदे शेतकर्यांच्या माथी मारले आहे. दिल्लीत बसून कृषी विभाग चालवता येत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
केंद्र सरकारने शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी जे तीन मंत्र्यांची समिती नेमली, त्यावरही पवारांनी टीका केली आहे. शेतीचे आणि शेतकर्यांच्या प्रश्नांचे सखोल ज्ञान असलेल्या मंत्र्यांचा यात समावेश करणे गरजेचे होते असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात उद्या चर्चेची फेरी होत आहे. त्यात तोडगा निघाला नाही तर विरोधकांची बुधवारीच एकत्रित बैठक बोलावून त्यात पुढील रणनिती निश्चीत केली जाईल.