नगर, (दि.05 डिसेंबर) : शहर व उपनगरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी, अशी मागणी महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी पोलिस प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहर व उपनगरामध्येे चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील १० महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेक नागरिकांना कोरोनामुळे काम धंदा नाही. नागरिक घरी बसून होते.
सामान्य माणसांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध होत नव्हता. सध्याच्या परिस्थितीत काहीअंशी व्यवसाय सुरू झाले आहेत. केडगाव, सावेडी व उपनगरांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
त्यासाठी रात्रीची गस्त व बंदोबस्त वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती राहणार नाही, असे पोलिस प्रशासनाला दिलेल्या पत्रात महापौर यांनी म्हटले आहे.
