महापालिकेचे कामकाज ठप्प : महापालिका कर्मचारी युनियनचे कामबंद आंदोलन


नगर, (दि.10 डिसेंबर) : विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी महापालिका कर्मचारी युनियन पालिकेच्याच मुख्य इमारतीसमोर ठाम मांडून आहे!  पालिकेचे कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले असून, त्यामुळे पालिकेतील कामकाज ठप्प झाले आहे.


दरम्यान, दुपारी उशिरापर्यंत आयुक्तांशी चर्चेच्या फेर्‍या चालू होत्या. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. पालिकेचे पदाधिकारीही कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी प्रयत्न करताना दिसत होते.


पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी देणे, पदोन्नती दिलेल्या कर्मचार्‍यांचा फरक द्यावा, थकित भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करावी, सेवानिवृत्तांची देणी द्यावीत आदी मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी युनियनने आंदोलन हाती घेतले आहे.


धरणे आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला होता. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सकाळी महापालिकेत येऊन सर्व कर्मचार्‍यांना काम बंद करण्यास सांगितले. सर्व कर्मचारी काम बंद करून  महापालिकेतील रिकाम्या जागेत धरणे देऊन बसले. दुपारी आयुक्त मायकलवार व इतर अधिकार्‍यांसमवेत युनियनच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यामध्ये ठोस तोडगा निघाला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post