नगर, (दि.27 नोव्हेंबर) : दिव्यांगांसाठीचा 5 टक्के निधी ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नसल्याने दिव्यांगांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जात नाही, परिणामी दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे नगर पंचायत समिती कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा रुद्र अपंग संघटनेने दिला होता. मात्र गटविकास अधिकारी, नगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांगांसाठीचा 5 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश दिले असल्याची माहीती रुद्र अपंग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आशा गायकवाड यांनी दिली.
याबाबत श्रीम. गायकवाड म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांनी 5 टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करावा असे निर्देश आहेत. मात्र बहुतांश ग्रामपंचायती हा निधी खर्च करत नाही. या हक्काच्या निधीसाठी संघटनेने घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत सदर आंदोलन स्थगित करावे असे पत्र संघटनेला दिले.
आपल्या न्याय मागण्यांसाठी दिव्यांगांना नेहमीच आंदोलने करावी लागतात. डिसेंबर महीन्यात जागतिक अपंग दिन असून त्यापूर्वी न्याय मागण्या व दिलेली आश्वासने पूर्ण व्हावीत अशी मागणी या वेळी संघटनेने केली आहे.
यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे सर, सरचिटणीस दिपालीताई पडोळे, बापू पांडुळे, रामेश्वर तुपे, बेबीताई देवकर, कैलास शेलार, विजय पडोळे, सरोजिनी गांगुर्डे, नरेश सुंदेचा, श्रीकांत काळे, संतोष शेंडगे, अमोल कराळे, बाबा महापूरे, बाहुबली वायकर आदी उपस्थित होते.
