नगर, (दि.24 नोव्हेंबर) : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 60 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना माणिकनगरमधील एमएसईबी कॉलनीत दि. 10 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत घडली.
याप्रकरणी विश्वास माधवराव शेळके (वय 73, रा. एमएसईबी कॉलनी, माणिकनगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 60 हजाराचा ऐवज चोरून नेला.
सपोनि भंगाळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ ढगे हे करीत आहेत.
