जि. प. सभेच्या ठिकाणात अचानक बदल; सदस्यांचे आंदोलन


नगर, (दि.11 नोव्हेंबर) : जिल्हा परिषदेच्या सभेचे ठिकाण अचानक बदलल्याने एकच गोंधळ झाला. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी या संदर्भात सभागृहासमोर आणि नंतर सभागृहातही बैठा सत्याग्रह केला.

जिल्हा परिषदेची सभा अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन सभा होती. सभेस जे सदस्य येतील त्यांना सभागृहात बसू देणार होते, तसेच जे येणार नाहीत, त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावायची होती. 
 
जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात ही सभा होणार असल्याचे अगोदर सांगण्यात आले होते. मात्र अचानक या ठिकाणामध्ये बदल करून सभा स्थायी समितीच्या सभागृहात घेण्याचे ठरले. याची माहिती सदस्यांना नव्हती. 
 
सभेस उपस्थित राहण्यासाठी शालिनीताई विखे यांच्यासह काही काँग्रेस व भाजप सदस्य आले असता त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य सभागृह बंद अवस्थेत दिसले. सभेची वेळ झाली तरीही सभागृह उघडले जात नसल्याने त्यांनी याची विचारणा केली असता सभेचे ठिकाण बदलले असल्याचे सांगण्यात आले. 
 
त्यामुळे त्यांच्यासह सदस्यांनी मुख्य सभागृहाचे दार उघडण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले. नंतर स्थायी समितीच्या सभागृहात हे सदस्य सभेसाठी गेले असता, त्यांनी तेथेही याचा जाब विचारत आंदोलन केले. यावेळी जालिंदर वाकचौरे यांच्यासह भाजप आणि काही काँग्रेस सदस्यांनी अध्यक्षांना जाब विचारला.
 

पत्रकारांना विरोध, पण...
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना सभेस बसण्यास नकार देण्यात आला. अध्यक्षांनी ही परवानगी नाकारली. एकीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांना नकार देत असतानाच दुसरीकडे स्थायी समितीच्या छोट्या सभागृहात सदस्यांची मात्र गर्दी झाली. खचून भरलेल्या या सभागृहात कुठेही सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्यात आला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post