भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’ : रोहित पवारांचा टोला


मुंबई, (दि.17 नोव्हेंबर) : कोरोनाच्या परिस्थितीमुळे 8 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं अखेर उघडण्यात आली आहे. भाजपने हा आपल्या आंदोलनाचा विजय असल्याचा सांगत जल्लोष सुरू केला आहे. पण, ‘हा विजय कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी आध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी, भाविक व जनतेचा आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोला लगावला.

 

आज पाडव्यापासून राज्यातील मंदिरं उघडण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप नेत्यांकडून मंदिरांमध्ये महापूजा करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीट करून भाजप नेत्यांना फटकारले आहे.

 

‘धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजपने पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी आध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

 

आज सकाळी रोहित पवार यांनी कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत श्री. गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली. यावेळी ‘धार्मिक स्थळं उघडल्याने या परिसरातील व्यवसायांनाही चालना मिळेल. पण कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे कुणीही दुर्लक्ष करु नये’ अशी विनंतीही रोहित पवार यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post