जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
यांच्याकडून जिल्हा रुग्णालयाची पाहाणी
नगर, (दि.04 नोव्हेंबर) : सध्या कोविडचा प्रादुर्भाव जरी प्रथमदर्शनी कमी झालेला दिसत असला तरी याच विषाणुची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची चाहूल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) यांनी दिलेली असून, यासाठी नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे, गर्दी न करणे, अति गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.राजेंद्र भोसले यांनी केले.
नगरच्या जिल्हा रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नुकतीच भेट देऊन तेथे सुरु असलेल्या कोविड सेंटरची तेथील कामकाजाची, सोयी - सुविधांची, आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची, वॉर्ड इतर तपासणी विभागास भेट देऊन तेथे उपस्थित डॉक्टर्स, अधिकारी, स्टाफ, नर्सेस यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना उपयुक्त अशा सूचना दिल्या. सिव्हील हॉस्पिटल व प्रशासन यात कदाचित जर परत ही कोविडची लाट आली तरी अधिक सुसज्जता कशी वाढविता येईल, याबाबतही त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.
तेथे उपस्थित कोविड रुग्णांच्या नातेवाईकांचे डॉ.भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दर्शना धोंडेे, डॉ.महावीर कटारिया, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, कोविड - 19 चे जिल्हा समन्वयक डॉ.बापूसाहेब गाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज घुगे, डॉ.संदिप कोकरे, डॉ.विशाल केदारे, डॉ.धनंजय वारे, रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ.भुषण रामटेके, मुख्य अधिसेविका विद्युलता गायकवाड, लॅब टेक्निशियन माया कोल्हे आदि यावेळी उपस्थित होते.
सिव्हील सर्जन डॉ.सुनिल पोखरणा यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये 20 के.एल.चा मोठा ऑक्सिजन स्टोअरेज टँक बसविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले व सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये 200 ऑक्सिजन पॉईंट असून, कोविड पेशंटला पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये अवघ्या 21 दिवसांत पीसीआर लॅब आम्ही सुरु केली होती व राज्यातील ही पहिली टेस्टींग लॅब होती. कोविडच्या माध्यमातून आलेल्या सर्व पेशंटना अतिशय चांगल्या पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरीद्वारे सोयी-सुविधा देऊन तपासणी केली जातात व योग्य उपचार केले जातात.
सिव्हील हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ दिवस-रात्र रुग्णसेवेचे कार्य करीत असून, कोविडवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम आहे व यापुढेही राहील, असे सांगितले. यावेळी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी चर्चा करतांना सांगितले की, सिव्हील हॉस्पिटलमध्ये नोबल व धूत फौंडेशनच्यावतीने अत्याधुनिक आयसीयू विभाग सुरु झालेला आहे. निष्णांत अशा फिजिशियनच्या सहकार्याने आलेल्या रुग्णांना येथे सेवा दिली जाते. व जिल्हा रुग्णालयातील परिसरातील अतिक्रमण काढून त्याचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. जेणेकरुन वातावरण प्रसन्न राहण्यास यामुळे मदत होत आहे.