नगर, (दि.18 नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज इयत्ता 8 वी व 5 वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यानुसार रेसिडेन्शिअल हायस्कूल अहमदनगरची सह्याद्री गायकवाड इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण राज्यात दुसरी आली तर रेसिडेन्शिअल हायस्कूल चे शर्वरी राऊत, प्रथमेश कोरडे, श्रेया ठुबे, सायली तांबे हे विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले.
शहरी विभागात रेसिडेन्शिअलचे इयत्ता 8 वीचे 88 विद्यार्थी तर इयत्ता 5 वीचे 112 विद्यार्थी असे एकूण 200 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 62 % लागला आणि इयत्ता 8 वी व 5 वी चे शहरी क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे 75 विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरले आहेत.
गेल्या पाच ते वर्षांपासून रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या गुणवत्तापूर्ण निकालाने केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवला आहे. दोन वर्षांपूर्वी कु. श्रध्दा लगड संपूर्ण राज्यात इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आली होती तीच परंपरा कु. सह्याद्री गायकवाड हिने कायम ठेवली आहे. सदर विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य अशोक दोडके, नारळे जे. एन., हेमंत कुटे, अमृते सी. सी., पाटील पी. ए., ठुबे एस. डी., काळदाते जयश्री व निवडुंग जे. एन. यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वरील सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी.खानदेशे, सह सचिव ऍड.विश्वासराव आठरे, खजिनदार व सर्व संस्था पदाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण सह संचालक दिनकरराव टेमकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
सदर शिष्यवृत्ती परीक्षेचा गुणवत्तापूर्ण निकाल हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर ही संस्था राबवत असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांचे, उपाययोजनांचे व दर्जेदार भौतिक सुविधांचे फलित आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अशोक दोडके यांनी दिली.
