मातोश्री वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
नगर, (दि.02 ऑक्टोबर) : जो हसतमुख असतो, तो नेहमी सुखी असतो. ज्याचे मन आनंदी असते, तोच खर्या अर्थाने धनवान. आनंदी चेहरा हा जीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच माणसाने नेहमी आनंदी व समाधानी रहावे. माणूस वयाने जरी वृद्ध झाला असेल, परंतु तो मनाने तरुण असतो. वयाने जरी आपण वृद्ध झालो असलो, तरी कोणीही स्वतःला वृद्ध न समजता आनंदीमय जीवन जगावे. समाजानेही वृद्धांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, असे प्रतिपादन आगरकर मळा स्टेशन परिसर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के. डी. खानदेशे यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संघाच्या वतीने विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी किराणा साहित्य देऊन त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी श्री. खानदेशे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवाजीराव ससे, नूरआलम शेख, मधुकर वालेकर, श्रीकृष्ण लांडगे, रामदास लालबागे, डॉ. अरविंद गुगळे, दत्तात्रय फुलसौंदर, सर्वोत्तम क्षीरसागर, नांगरे पाटील, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया, महावीर जैन आदींसह ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
खानदेशे पुढे म्हणाले की, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सालाबादप्रमाणे संघाने मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसमवेत साजरा करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री वृद्धाश्रमास किराणा देऊन स्नेहभोजन देण्यात आले. समाजानेही वृद्धांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. लहान मुले व वृद्ध व्यक्ती सारखीच असते. त्यांना सर्वांनी समजून घ्यावे. माता-पित्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. वृद्धाश्रम हे वृद्धांसाठी एक मंदिर असल्याचे ते म्हणाले.
यावेळी वृद्धाश्रमचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांनी स्टेशन परिसर आगरकर मळा ज्येष्ठ नागरिक संघाचे मनापासून आभार मानले व अशा सर्व सामाजिक संघटनांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. ज्येष्ठांनी ज्येष्ठांसमवेत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला ही एक कौतुकास्पद बाब आहे, असे ते म्हणाले.
