मनपा करणार नवीन पद्धतीने रस्त्याचे पॅचिंग : आमदार संग्राम जगताप यांच्याकडून कामाची पाहणी


नगर, (दि.06 ऑक्टोबर) : महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खडडे पडले आहेत. नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी मनपाने नवीन पद्धतीने खडडे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी माळीवाडा परिसरात पाहणी करून सूचना केल्या.


यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, खंडु काळे, भरत पवार, मनपा अभियंता निंबाळकर, सुरेश इथापे, वैभव वाघ आदींसह नागरिक उपस्थित होते. रस्ता पॅचिंगच्या कामाची सुरुवात मार्केट यार्ड चौकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली.


आ.संग्राम जगताप म्हणाले की, दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा पावसाळा चांगला झाला आहे. मोठा पाऊस झाल्याने अगोदरच दाणादाण उडालेल्या रस्त्यांची वाट लागली. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आता पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असून, मनपाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

 

उत्कृष्ट पद्धतीने खड्डे बुजविल्यास नगर खड्डेमुक्त होऊ शकेल. त्यासाठी मनपा अभियंत्यांनी जातीने लक्ष घालून शहरातील खड्डे बुजवून घ्यावेत. या कामात कुठलाही कसूर खपवून घेतला जाणार नाही. शहरातील खड्डे हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असून, तो मनपाने तातडीने सोडवावा. या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे ते म्हणाले.


मनपा अभियंता निंबाळकर यांनी या कामाबाबत आ.संग्राम जगताप यांना माहिती दिली. ते म्हणाले की, सुरुवातीला शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. पारंपरिक खड्डे बुजविण्याऐवजी ते नवीन पद्धतीने बुजविले जातील. यामुळे बुजविलेले खडडे पुन्हा उखडणार नाहीत. प्रथमतः या खड्डयातील  माती  जेसीबीने  काढून  घेतली  जाईल. तो खड्डा पूर्णतः साफ केला जाईल. 

 

खडड्याची लेव्हल केली जाईल. खड्डयामध्ये साठलेले पाणी काढले जाईल. जेणेकरून या खड्यामध्ये खडी व डांबर टाकल्यानंतर तो निघणार नाही. दोन ते तीन दिवस खड्डा तसा ठेवून त्यानंतर त्यामध्ये भराव टाकून खडी व डांबर टाकून तो बुजविला जाईल. खड्डे साफ केल्यानंतर पाऊस झाल्यास पुन्हा काही काम करावे लागेल. त्यामध्ये एक ते दोन दिवस जाऊ शकतात. चांगल्या पद्धतीने काम हे काम केले जाईल. जेणेकरून हे काम मजबूत होईल, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post