लोणंद
येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या शारीरिक
शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या
विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.टी.एन.घोलप
होते. तसेच व्याख्याते प्रा.पोपटराव सोनवणे हे सुध्दा उपस्थित होते.
रयत
शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना भरतीची तयारी करण्यासाठी
प्रत्येक महाविद्यालयात भरतीपुर्व प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र स्थापन
करण्यात आले आहे. याच माध्यमातून महाविद्यालयाच्या वतीने आॅनलाईन झुम व
युटयुबच्या माध्यमातून आॅनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होतेे. या
व्याख्यानामध्ये सहायक पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्तालय पंकज शिरसाठ
यांनी 'भरतीपुर्व फिजिकल फिटनेस काळाची गरज' या विषयावर व प्रा.पोपटराव
सोनवणे, संचालक एव्हरेस्ट करिअर अॅकडमी यांनी 'पोलीस भरती 2020 लेखी
परीक्षेची तयारी करतांना' या विषयावर व्याख्यान दिले.
पंकज
शिरसाठ यांनी पोलीस भरतीची शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशा पध्दतीने
करायची याची सविस्तर माहिती दिली. तसेच यामध्ये होणारे 100मीटर, 1600 मीटर,
गोळाफेक, लांबउडी, छाती कशा पध्दतीने फुगवली पाहिजे, किती वेळेत आपण रनिंग
पुर्ण केली पाहिजे, किती मीटरपर्यंत गोळा फेकला पाहिजे व त्यासाठी मिळणारे
गुण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक इव्हेंटमध्ये पैकीच्या पैकी
गुण मिळविण्याचे ध्येय सर्वांनी ठेवले पाहिजे. याबरोबरच रोजच्या
सरावाबरोबरच आहाराचे महत्वही त्यांनी विद्याथ्र्यांना सांगितले.
प्रा.पोपटराव
सोनवणे यांनी पोलीस भरतीसाठी मोठी स्पर्धा असते त्यासाठी परिपूर्ण तयारी
केली पाहिजे. तुम्ही ध्येयाने प्रेरित असाल, मनात जिद्द ठेवली तर यश
मिळतेच. करोना कधी जाईल, राज्य शासन भरती कधी करेल अशा प्रश्नांचा विचार न
करता आपली तयारी चालू ठेवायची. शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षा
घेतली जाते. या लेखी परीक्षेमध्ये साधारण पाच विषयांचा समावेश असतो.
यामध्ये गणित, सामान्य विज्ञान, बुध्दीमापन, मराठी व्याकरण, चालू घडामोडीवर
प्रश्न असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त
प्रश्नपत्रिकांचा सराव, वाचन, वृत्तपत्राचे वाचन, शासन व्यवस्था, राज्य
घटनेचा अभ्यास करावा. तसेच ज्या जिल्हयात भरतीसाठी जाणार आहात त्या
जिल्हयाची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय
मनोगतात प्राचार्य डाॅ.टी.एन.घोलप यांनी महाविद्यालयाच्या वतीने
राबविण्यात येत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा उपक्रमांबाबत सविस्तर माहिती
दिली. महाविद्यालयाच्या वतीने पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन केंद्राच्या
माध्यमातून आयोजित व्याख्यानाचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल असे
नमूद केले. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठीय
अभ्यासक्रमासोबत दहावी, बारावी अभ्यासक्रमाचाही जास्तीत जास्त आधार
घेण्याचे आवाहन प्राचार्य डाॅ.टी.एन.घोलप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डाॅ.विजय म्हस्के यांनी केले. आभार डाॅ.एस.बी.राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ.एम.ए.पटारे, प्रा.सागर शेंडे, डाॅ.संदिप कवडे, प्रा.नंदकुमार साळुंके आदिंनी सहकार्य केले. सदर आॅनलाईन व्याख्यानाचा लाभ २७० विद्यार्थ्यांनी घेतला.
