आरोपींना अटक करा ; अन्यथा आंदोलन : वंचित बहुजन आघाडीचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचे 2 नोव्हेंबर रोजी

 पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन

 

नगर,दि.21 (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील तरुणाच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा योग्य पध्दतीने तपास करावा व आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आरोपींना पारनेर पोलिसांनी त्वरित अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षक  कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सह समन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.


अहमदनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना मंगळवार दि. 20 रोजी या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी ड. डॉ. अरुण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, जगु गायकवाड, लोकाधिकार आंदोलनाचे श्रीगोंदा तालुका समन्वयक संतोष भोसले, ज्योती भोसले, राजू भोसले, विनोद भोसले, दत्ता भोसले, सुनिल चव्हाण, अहिस्ता भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री, मा. खा. डॉ.प्रकाश आंबेडकर, आदिवासी विकास मंत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे. म्हसे बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील आदिवासी तरुण परसराम भालचंद्र काळे याने रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द शिवारातील शिंदे मळ्यातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

 

त्याला गावातील सुभाष मारुती बढे व शिवाजी दिनकर मदगे या दोघांनी म्हसे ग्रामपंचायत हद्दीतील रानात मेंढ्या चारण्याच्या वादातून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली व आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार विनोद निवृत्ती भोसले यांनी सोमवार दि. 12 ऑक्टोबर रोजी पारनेर पोलीस ठाण्यात केली होती.


जिल्हयात आदिवासी भटके विमुक्तांवर होणार्‍या अन्याय अत्याचार, खून, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त  करणे व जातीय अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. ही बाब गंभीर असून जिल्हा प्रशासनाने  याची  गांभीर्याने  दखल  घ्यावी, अशी  मागणी  त्यांनी  निवेदनाद्ववारे  केली  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post