‘विठ्ठल-रुख्मिणी’ची रांगोळी रेखाटून आषाढी वारीला कोरोनामुक्त करण्याची प्रार्थना

नूतन भुजबळ यांनी एकादशीला केलेला संकल्प


नगर, (दि.22) : 25 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु झाले. कोरोनाच्या महामारीतून मार्ग काढण्यासाठी अवघा देश एकवटला. मंदिर, मस्ज़िद, चर्च, गुरुद्वारा बंद करण्याची वेळ आली. प्रत्येकजण कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी देवाला साकडं घालीत आहेत. एप्रिलमध्ये तर अनेक जत्रा, यात्रा रद्द झाल्या जन्मोत्सव साजरे झाले नाही. भक्तांच्या दु:खाला भगवंत देखील थांबवू शकला नाही.

लॉकडाऊनच्या काळात ज्याने त्याने आपआपले छंद जोपासाले. नगरमधील पाईपलाईन रोड वरील यशोदानगर मध्ये राहणार्‍या नूतन जवाहर भुजबळ या गृहिणीने मात्र  एकादशीला एक आगळा - वेगळा संकल्प केला. पहाटे 5 वा. पांडूरंगाचे स्मरण करुन घरातच 7 ते 8 फूट मोठी रांगोळीमधून चक्क विठ्ठल - रुख्मिणी रेखाटून ‘माऊली-माऊली’ चा धावा करीत अखंड नामस्मरणामध्ये दिवसभर ‘विठ्ठल - रुख्मिणी’ला येणारी आषाढी ‘वारी’ ही कोरोनामुक्त होऊ दे अशी प्रार्थना केली.

या आगळ्या-वेगळ्या संकल्पाने भुजबळ कुटूंब भारावले; कारण कित्येक वर्षांपासून वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत बहिणाबाई संस्थानची दिंडी यशोदानगरला येते. या कुटूंबातर्फे वारकर्‍यांना दुपारचे भोजन असते. पालखी पूजन, मिरवणुक, किर्तनाचा सोहळा येथे संपन्न होतो. यावर्षी देखील ही दिंडी येथे यावी, महाराष्ट्रातून पंढरपुरला जाणार्‍या आषाढीवारीला कोरानामुक्त करण्याची प्रार्थना नूतन भुजबळ यांनी केली. त्यांच्या या संकल्पाचे कॉलनीत कौतुक होत आहे. रांगोळीतून साकारलेल्या विठ्ठल - रुख्मिणीच्या दर्शनासाठी बाळासाहेब भुजबळ व राजश्री भुजबळ यांनी सोशल डिस्टसन्, सॅनिटरची व्यवस्था करुन भाविकांना लाभ दिला.

Post a Comment

Previous Post Next Post