कल्याण रोडवरील मयताचा खूनच तपासात निष्पन्न

आरोपी अटक ; नगर तालुका पोलिसांची कामगिरी
 
 
नगर, (दि.23) : येथील नेप्ती शिवारातील रस्त्याच्या पुलाखाली सापडलेल्या मयत अनोळखी पुरुषाच्या प्रेताची ओळख पटली असून, त्याचा खूनच झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दि.18 एप्रिलला कल्याण महामार्गावर नेप्ती शिवारात पुलाखाली कुजलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचे प्रेत सापडले होते. या घटनेची नगर तालुका पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी भेट देऊन तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी प्रेताची व घटनास्थळी पाहणी केली होती. यानंतर प्रेत पीएमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या दरम्यान, नंदा रघुनाथ बर्डे (रा.नालेगाव) या महिलेचा पती रघुनाथ एकनाथ बर्डे हे निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार प्रेताची ओळख पटविण्यासाठी नंदा बर्डे हिला प्रेत दाखविले. तिने प्रेत पती याचेच असल्याबाबत साशंकता व्यक्त केली. त्यानुसार पीएम करण्यात आले. यात डॉक्टरांनी गळा दाबून मयत झाल्याचा अभिप्राय दिला.

त्याप्रमाणे नगर तालुका पोलीस ठाण्यात 302,201 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तद्नंतर मयताची डीएनए तपासणीत प्रेत हे रघुनाथ एकनाथ बर्डे (रा.नालेगाव ता.जि.अहमदनगर) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तपास सुरू असताना, सपोनि शंकरसिंग राजपूत यांना गोपनीय माहिती मिळाली की, मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (रा.बुरुडगाव ) हा मयत रघुनाथ बर्डे याचेसोबत नेप्ती शिवारात दिसला होता. पोलीसांनी तात्काळ मच्छिंद्र याला ताब्यात घेतले, त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, रघुनाथ याचा गळा दाबून मारल्याची मच्छिंद्र म्हस्के याने कबुल दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि शंकरसिंग राजपूत, पो उप नि रितेश राऊत, धनराज जारवाल, पोहेकाँ बापूसाहेब फोलाने, पोना रावसाहेब खेडकर, अशोक मरकड, राहुल शिंदे, बाळू कदम, मपोना प्रमिला गायकवाड, पोकाँ ज्ञानेश्‍वर खिळे, धर्मराज दहिफळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार, सपोनि संदीप पाटील व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी ही महत्वपूर्ण कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post