डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना ७ वर्षांची शिक्षा


नवी दिल्ली, (दि.22) : कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांच्या रक्षणासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. डॉक्टर किंवा कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यावर  हल्ला  केल्यास  ७  वर्षांची  शिक्षा  होणार  आहे.

केंद्र सरकारने महामारी रोग अधिनियम १८९७ या कायद्यात वटहुकुमाद्वारे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजांच्या काळातील १२३ वर्षे जुन्या कायद्यात मोदी सरकारच्या निर्णयामुळे महत्त्वाचा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असा बदल होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वटहुकुमाची माहिती दिली.

डॉक्टर किंवा कोणत्याही वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यास किमान ६ महिने आणि जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेला वटहुकूम सरकार काढत आहे. भारतीय संविधानात असलेल्या जुन्या कायद्यात वटहुकुमामुळे बदल होणार आहे. दोषींना १ ते ५ लाख रुपये दंड करण्याचीही तरतूद सरकारने वटहुकुमाद्वारे केली आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांच्या आरोग्य विम्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरांना नुकसान भरपाई म्हणून ५० हजार ते २ लाख रुपये दिले जाणार आहेत. सरकारने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १.८८ कोटींच्या नव्या पीपीईची ऑर्डर नोंदवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post