नगर (दि.23) : कोरोना लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना शास्ती भरणे परवडत नाही. त्यामुळे संकलित करात एप्रिल महिन्यात दहा टक्के सूट व मे व जून महिन्यात प्रत्येकी आठ टक्के सवलत देण्यात यावी. त्याबरोबरच शास्ती माफ करावी, या एकाच मागणीबाबत माजी महापौर शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, तसेच माजी विरोधी पक्षनेते शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांनी दोन स्वतंत्र पत्रं मनपा प्रशासनाला दिली.
फुलसौंदर यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिक व्यवहार ठप्प असल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण शास्तीमाफी करून कर आकारणीवर दहा टक्के सवलत द्यावी अशी मागणी केली आहे. बोराटे यांनी यापूर्वी 18 मार्चला आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत स्मरणपत्र दिले आहे. शास्ती माफीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मालमत्ताधारकांना शास्ती भरणेही परवडत नाही. शास्ती माफ करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्यानुसार मालमत्ता करात 100 टक्के शास्ती माफ करण्यात यावी. तसेच मालमत्ताधारकांना संकलित करात दहा टक्के सूट देण्याचीही मागणी बोराटे यांनी केली. एकाच मागणीचे दोन स्वतंत्र पत्र शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी दिले आहेत.
दरम्यान, मालमत्ता कर हेच महापालिकेचे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. यंदा लॉकडाऊनमुळे कर्मचारी अन्य कामात व्यग्र असल्याने मालमत्ताकराच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे.
Tags:
Ahmednagar
